आपला कोणताही उत्सव तोंडावर आला की चर्चा सुरू होते ती प्रदूषणाचीच.
गणेशोत्सव आला, की नदीच्या प्रदूषणाची आणि दिवाळी आली की
हवेच्या प्रदूषणाची. भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिकजवळ जाणारी संस्कृती आहे. भारतीय सण म्हणजे निसर्गाची पुजा, मात्र असे असताना अलिकडच्या काळात सणांनीही प्रदूषण वाढविण्यात मोठा
हातभार लावला असल्याचे नाकारता येत नाही.
"दिन दिन
दिवाळी...गायी-म्हशी ओवाळी...',"इडा- पिडा टळो; बळीचे राज्य येवो...' अशी गाणी आणि आसमंत उजळून टाकण्यासाठी हातात दिवट्या घेऊन
निघालेली बच्चे कंपनी. आजही ग्रामीण भागात दिसतात, सर्वांना हवेहवेसे वाटणारे हे रूप. दिव्यांचा, आनंदाचा, स्नेह-प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आजही ग्रामीण भागात
पारंपरिक पद्धतीने हर्षोल्हासात साजरा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात
प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत शहरी भागात डोकावून बघितले तर प्रदूषणाचे
प्रमाण मोठ्या प्रमाणात होताना दिसते. कारण तेथे वाढते शहरीकरण, वाढणारी लोकसंख्या आणि
त्यातून सणवारच्या काळात होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणत आहे. निसर्गाची पूजा
ग्रामीण त्याच पद्धतीने होताना दिसते मात्र शहरी भागात त्याला वेगळेच रूप पहावयास
मिळते.
ग्रामीण भागाप्रमाणे पारंपरिक
पद्धतीने दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करावी. दिवाळी साजरी करताना सामाजिक
जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची
आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत
नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठ्या संकटास
आपण आमंत्रण देतो. फटाके पेटवल्याने प्रदूषणातही भरच पडते. वायू प्रदुषणापेक्षा
दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर १२५ डेसिबल पेक्षाही मोठ्या
प्रमाणात आवाज येणा-या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय. तरीही काही
माणसं मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणा-या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव
काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधींच्या व्याधी
सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संर्पकात आल्याने तात्पुरता किंवा
नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळण्यासाठी यंदा प्रदूषण मुक्त
दिवाळी साजरी करावी लागणार आहे. असे दरवर्षी म्हणण्याची वेळ येऊ नये याकडे आपण
सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
सर्व प्राणीमात्रांसाठी, व्यक्तींसाठी तसेच पर्यावरणासाठी येणारा
दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकून पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी
केली पाहिजे. दिवाळी म्हणजे
नक्की काय तर मातीपासून बनवलेल्या सुंदर पणत्यांमध्ये तेलाचा दिवा उजळवून
अज्ञानारूपी अंधकारचा शेवट करायचा असतो. असं केल्याने जुन्या वाईट गोष्टी नष्ट
होऊन, नव्या प्रकाशाचा, नवनवीन उत्साही गोष्टींचा जन्म होतो. पण
काही व्यक्ती दिव्य प्रकाशांचा हा सण साजरा करण्यासाठी असुरक्षित मार्गांचा अवलंब
करताना दिसतात.मात्र यंदा
प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा
प्रयंत्न करण्याची आवश्यकता आहे.
विकास भुजबळ, लासलगाव
No comments:
Post a Comment