Tuesday, November 5, 2013

वयात आलेला पाऊस


प्रत्येकाच्या पावसाच्या कल्पना कदाचित वेगवेगळ्या असतील, पण प्रत्येक माणूस हा पावसावर मनापासून प्रेम करतो हे मात्र खर. मे महिन्याच्या रणरणत्या ऊन्हाला कंटाळून का होईना, जून महिन्यातल्या गार-गार सरींची सगळेच मनापासून प्रतीक्षा करत असतात. काही जण पावसाला वैतागतात, काही सुखावतात काहींना पावसाचा खूप राग येतो, काहींचा मात्र तो सच्चा यार असतो, कोणी बरसणाऱ्या सरी सोबत उत्सव साजरे करतात, तर कोणी डोळ्यातले पाणी त्याच सरींसोबत वाहू देतात. कोणाच्या आनंदाचे कारण पाऊस, कुणाच्या अश्रुंना वाट करून देणारा पाऊस, कुणासाठी चिखल म्हणजे पाऊस, तर कुणासाठी मजा म्हणून पाऊस.

मला वाटत की ह्या अश्या पावसाच्या व्याख्या वयानुसार बदलतात. म्हणजे शाळेत असताना पाऊस म्हणजे नवा रेनकोट, नवी बूट सगळ नवीन नवीन, येरे येरे पावसा म्हणत पाण्यात होडी सोडन, डबक्यात चिखलाची अंघोळ आणि मग सर्दी तापाच निमित्य म्हणून शाळेला दोन दिवस दांडी. कॉलेजात गेल्यावर मात्र हाच पाऊस पार बदलून जातो, तेव्हा मात्र ‘’येरे येरे पावसा’’ न आठवता प्रेम कविता सुचतात. सुचतात म्हणजे कवितांना जणू उत येत असतो. मग भर पावसात गाड्यावरची भजी आणि नदीवरच्या, समुद्रावरच्या पिकनिकचे बेत ठरतात, बाईकवर बसून लॉगड्राईवला फिरणं होत . प्रेमात पडलेल्या लोकांसाठी तर पाऊस म्हणजे पर्वणी. पावसाचा थेंब न थेंब अंगावर घेत प्रियकरासोबत भिजणं म्हणजे अहाहा ... हो पण विरहात जखमी असलेल्यासाठी पाऊस म्हणजे जखमांवर ‘’मीठ’’ मनातल काहूर सरींच्या रुपात जणू जमिनीवर थैमान घालत असत, सोबतीला आठवणीचे चटके आणि इच्छा असूनही पावसात न भिजण्याची स्वतःच स्वतःला घातलेली शपथ.

या वयाला पार करून गेलेला पाऊस मात्र याहून खूप वेगळा ऑफिसला दांडी म्हणून वैताग, घरात छत्र्या रेनकोट ची खरेदी म्हणून वैताग, मुलाचं आजारपण म्हणून वैताग आणि गच्चीवरची ‘’ओन्ली मेन ‘’ पार्टी बंद म्हणून वैताग. या वैतागत मग कधी रोमांटिक गाण्यांना जागा नसते कि कधी बायकोचा चेहरा बघून सुचणाऱ्या शायरीला जागा नसते. कधी विनाकारण पावसात भिजण नसत कि कधी पेटीत बंद असलेल्या कवितांच्या वहीची साधी आठवणही नसते. उतारवयात मात्र पावसाचा अर्थ नातवंडाना ‘’आम्ही तुमच्या पेक्षा चार पावसाळे अधिक पहिले आहेत’’ अस सुनावतानाच होतो.

कुणाला पावसासारख जगावास वाटत, कुणाला पाऊसच व्हावस वाटत.

थेंबा थेंबा तून जगातल्या प्रत्येक माणसाला आसु आणि हसू वाटताना पाऊस कस बर मोजमाप करत असेल? स्वतःकडे कणभरही राखून न ठेवता फक्त देत राहण्यासाठी पावसाला किती मोठ काळीज कराव लागत असेल.. कोणाच प्रेम, कोणाचा रोष पदरात घेत बरसत राहाणं त्याला कसं जमत असेल. पाऊस देण्यातला आनंद उपभोगत असेल की, देवूनही मी रिकामा म्हणून तो अश्रू ढाळत असेल...., ही सर्व अनुत्तरीत प्रश्ने वयात आलेला पाऊसच विचारू शकतो.

 -    चित्रा बोराडे-राजगुरू, नाशिक

No comments:

Post a Comment