Tuesday, November 5, 2013

गोंदेश्वर मंदिर

ओळख – 
संत भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आपल्या येथील इतिहासाची साक्ष देतात. उन, वारा, पाऊस आणि परकीय आक्रमणे सोसत हिंदू  संस्कृतीचा वारसा जपणारी हि वास्तू शिल्पे त्या काळातील आपल्या पूर्वजांच्या हर हुन्नरी पणाची आठवण करून दिल्याशिवाया राहत नाही. नाशिक जिल्हा तर अशा मंदिराच्या अस्तित्वानेच पावन झाला आहे. यातील काही मंदिरांमुळे नाशिकचे नाव सातासमुद्रापलिकडे पोहचले आहे. सिन्नर शहरातील गोंदेश्वर हेमाडपंथीय मंदिर त्या  पैकीच एक आहे.

इतिहास -  
भारतीय स्थापत्य शैलीपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमांद्री पंडित किंवा हेमांड पंथ यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उद्योग केल्याने ही बांधणी पद्धत त्याच्या नावावरून हेमाडपंथी म्हणून ओळखले जाऊ लागले.  सिन्नर मध्ये देखील त्या काळात या राजाचे शासन असल्याने गोंदेश्वर मंदिर बांधण्यात आले. मंदिराचे हेमाडपंथी पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिल्याने ते आजही अभ्यासकाना उपलब्ध आहे. सामान्यत: इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यानाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना हेमांडपंथी रचनांमध्ये केली जाते. औंढा नागनाथ आणि सिन्नरचे गोंदेश्वर ही स्थापत्य शैली चे काही उदाहरण आहेत.
यादवकालीन हेमांड पंथी मंदिरे हि महाराष्ट्राला मिळालेली एक अपूर्व देणगीच आहे. भव्य, दिव्य, अप्रतिम कलाकुसर व काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती आणि मंदिर ही त्यांची वैशिष्ट्य म्हणता येईल. नाशिक शहरापासून २७ किमी अंतरावर असणारया सिन्नर शहरात दक्षिण दिशेला वसलेले गोंदेश्वराचे अतिप्राचीन मंदिर अंदाजे १२ व्या शतकात गवळी राजकुमार राज गोविंद यांनी बांधले आहे. गोंदेश्वर किंवा गोविन्देश्वर म्हणून या मंदिराला ओळखले जात असून इंडो-आर्यन पद्धतीनुसार मध्ययुगीन  काळात बांधलेले हे मंदिर आहे. गोंदेश्वराचे भव्य मंदिर १२५ फुट बाय ९५ फुट आकाराचे आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिराचा समुह असल्याने त्याला शेव पंचायतन म्हंटले जाते. यातील गोंदेश्वराचे  मुख्य शिव मंदिर मध्यावर असून सोभावतीची चार उपदिशाना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे.

गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे  पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेलं आहे. गर्भगृहात रेखीव शिपिंड आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून  त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व- अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहे. मंदिरातील शिल्पकाम त्रिमिती असून त्यावर पडणारया परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटातून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते. या मंदिराच्या बांधकामात चुना वापरण्यात आलेला असून बांधकामात जोड देणारे माध्यम नाही. त्या ऐवजी उखळी पद्धतीचे बांधकाम करण्यात आले आहे. दुर्मिळ असे हे मंदिर सद्यस्थितीत तग धरून असले तरी मंदिरातील कलाकुसर आणि कोरीव काम विविध कारणांमुळे लोप पावण्याच्या स्थितीत पोहचलेले आहे. सरकार वेळोवेळी कोट्यांवधी रुपयांचा निधी मंजूर करून मंदिराला पर्यटनाचा दर्जा देण्यचा प्रयत्न करत असेल. तरी मंदिरात अद्याप एका रुपयाचे काम करण्यात आलेले नाही. 

  
रथसप्तमिनिमित अनेक भाविक या मंदिरात येउन सूर्यपूजन करतात. तसेच विध्यार्थाकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार करून बलोपासनेचा संकल्प केला जातो. एवढे असूनही हे पर्यटन स्थळ पाहिजे त्याप्रमाणात उदयास येऊ शकेलेले नाही. सुट्टीमध्ये जर जवळच पर्यटन करावयाचे असल्यास हे एक उत्तम धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण ठरू शकेन.

                                                       -    राजश्री नानकर, नाशिक

No comments:

Post a Comment