Tuesday, November 26, 2013

भावपूर्ण श्रद्धांजली

देशदूत चे सल्लागार संपादक व जेष्ठ पत्रकार सुरेशजी नारायण अवधूत यांना विनम्र श्रद्धांजली

२६ नोव्हेंबर च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

तसेच गृहरक्षक दलाचे माजी जिल्हा समादेशक सुधाकर भालेकर यांना विनम्र श्रद्धांजली
-     
             श्रद्धान्वत - साप्ताहिक साथीदार परिवार, नाशिक

Monday, November 18, 2013

विनम्र अभिवादन : साथीदार अंक

साहेबांना विनम्र अभिवादन



 श्र्द्धानवत :- स्व. द्वारकादासजी पालीवाल बहुद्देशीय फाउंडेशन, जळगाव

साहेबांना विनम्र अभिवादन - साथीदार परिवार

साहेबांना विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पहिली पुण्यतिथी त्याबद्दल त्यांच्या स्मृतीस विनम्र वंदन.
साथीदार परिवाराकडून साहेबांना ही शब्दांजली !!



Tuesday, November 5, 2013

मग, यंदा साजरी कराल प्रदूषण मुक्त दिवाळी

आपला कोणताही उत्सव तोंडावर आला  की चर्चा सुरू होते ती प्रदूषणाचीच. गणेशोत्सव आला, की नदीच्या प्रदूषणाची आणि दिवाळी आली की हवेच्या प्रदूषणाची. भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिकजवळ जाणारी संस्कृती आहे. भारतीय सण म्हणजे निसर्गाची पुजा, मात्र असे असताना अलिकडच्या काळात सणांनीही प्रदूषण वाढविण्यात मोठा हातभार लावला असल्याचे नाकारता येत नाही.

    "दिन दिन दिवाळी...गायी-म्हशी ओवाळी...',"इडा- पिडा टळो; बळीचे राज्य येवो...' अशी गाणी आणि आसमंत उजळून टाकण्यासाठी हातात दिवट्या घेऊन निघालेली बच्चे कंपनी. आजही ग्रामीण भागात दिसतात, सर्वांना हवेहवेसे वाटणारे हे रूप. दिव्यांचा, आनंदाचा, स्नेह-प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आजही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने हर्षोल्हासात साजरा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत शहरी भागात डोकावून बघितले तर प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होताना दिसते. कारण तेथे वाढते शहरीकरण, वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून सणवारच्या काळात होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणत आहे. निसर्गाची पूजा ग्रामीण त्याच पद्धतीने होताना दिसते मात्र शहरी भागात त्याला वेगळेच रूप पहावयास मिळते.  

   ग्रामीण भागाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करावी. दिवाळी साजरी करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठ्या संकटास आपण आमंत्रण देतो. फटाके पेटवल्याने प्रदूषणातही भरच पडते. वायू प्रदुषणापेक्षा दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर १२५ डेसिबल पेक्षाही मोठ्या प्रमाणात आवाज येणा-या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय. तरीही काही माणसं मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणा-या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधींच्या व्याधी सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संर्पकात आल्याने तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळण्यासाठी यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी लागणार आहे. असे दरवर्षी म्हणण्याची वेळ येऊ नये याकडे आपण सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.

    सर्व प्राणीमात्रांसाठी, व्यक्तींसाठी तसेच पर्यावरणासाठी येणारा दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकून पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. दिवाळी म्हणजे नक्की काय तर मातीपासून बनवलेल्या सुंदर पणत्यांमध्ये तेलाचा दिवा उजळवून अज्ञानारूपी अंधकारचा शेवट करायचा असतो. असं केल्याने जुन्या वाईट गोष्टी नष्ट होऊन, नव्या प्रकाशाचा, नवनवीन उत्साही गोष्टींचा जन्म होतो. पण काही व्यक्ती दिव्य प्रकाशांचा हा सण साजरा करण्यासाठी असुरक्षित मार्गांचा अवलंब करताना दिसतात.मात्र यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा प्रयंत्न करण्याची आवश्यकता आहे.
विकास भुजबळ, लासलगाव

हतबल



यांच्या नशिबी दुष्काळच
ओला काय ? अन सुका काय ?
हतबलता ना काही दिलासा नाय...!

तहानलेल्या आईची चिंता
खळगी भरणाऱ्या बापाची चिंता
भेगाळलेला भूईला कस भिजवू ?
फुटलेल्या डोळ्यात पाणीच नाय...!

आश्वासनांची खैरातीला....
मुडद्याची रांग....!!
सावकारी कर्जांची दमझाक
आत्महत्या बाकी गाठोडे...!!
घरदारावर मात्र सार्यांचे पाय...!!

हेच रहाटगाड ग सारीकडे
नांगरलेले आयुष्य सारीकडे
निसर्गच कोपला....!!
तेहतीस कोटी देवांचे काय ??

हतबलता
बारमाही काहीशी अंधुक आशा फक्त ...!!
                       
                             - देविदास खडताळे, नाशिक

माझ्याच पासुन दूर मी ही


आज ही माझ्याच पासुन दूर मी ही
तू जशी आहे तसा मजबूर मी ही

भेटण्या जितकी मला उत्सुक असते
ये व्यथे ये तेवढा आतूर मी ही

जेवढे जातो जवळ ती लांब जाते
वाटते आता रहावे दूर मी ही

लागला होता तिला माझा लळा पण,
प्रेम ही केले तसे भरपूर मी ही

येवढे शिकलो यशश्वी डाव त्यांचे,
जाहलो बघ खेळतांना क्रूर मी ही

सांगणारे सांगता लाखो कहाण्या
नीट आता वाचतो मचकूर मी ही

                  -    दर्शन शहा (स्नेहदर्शन)

वयात आलेला पाऊस


प्रत्येकाच्या पावसाच्या कल्पना कदाचित वेगवेगळ्या असतील, पण प्रत्येक माणूस हा पावसावर मनापासून प्रेम करतो हे मात्र खर. मे महिन्याच्या रणरणत्या ऊन्हाला कंटाळून का होईना, जून महिन्यातल्या गार-गार सरींची सगळेच मनापासून प्रतीक्षा करत असतात. काही जण पावसाला वैतागतात, काही सुखावतात काहींना पावसाचा खूप राग येतो, काहींचा मात्र तो सच्चा यार असतो, कोणी बरसणाऱ्या सरी सोबत उत्सव साजरे करतात, तर कोणी डोळ्यातले पाणी त्याच सरींसोबत वाहू देतात. कोणाच्या आनंदाचे कारण पाऊस, कुणाच्या अश्रुंना वाट करून देणारा पाऊस, कुणासाठी चिखल म्हणजे पाऊस, तर कुणासाठी मजा म्हणून पाऊस.

मला वाटत की ह्या अश्या पावसाच्या व्याख्या वयानुसार बदलतात. म्हणजे शाळेत असताना पाऊस म्हणजे नवा रेनकोट, नवी बूट सगळ नवीन नवीन, येरे येरे पावसा म्हणत पाण्यात होडी सोडन, डबक्यात चिखलाची अंघोळ आणि मग सर्दी तापाच निमित्य म्हणून शाळेला दोन दिवस दांडी. कॉलेजात गेल्यावर मात्र हाच पाऊस पार बदलून जातो, तेव्हा मात्र ‘’येरे येरे पावसा’’ न आठवता प्रेम कविता सुचतात. सुचतात म्हणजे कवितांना जणू उत येत असतो. मग भर पावसात गाड्यावरची भजी आणि नदीवरच्या, समुद्रावरच्या पिकनिकचे बेत ठरतात, बाईकवर बसून लॉगड्राईवला फिरणं होत . प्रेमात पडलेल्या लोकांसाठी तर पाऊस म्हणजे पर्वणी. पावसाचा थेंब न थेंब अंगावर घेत प्रियकरासोबत भिजणं म्हणजे अहाहा ... हो पण विरहात जखमी असलेल्यासाठी पाऊस म्हणजे जखमांवर ‘’मीठ’’ मनातल काहूर सरींच्या रुपात जणू जमिनीवर थैमान घालत असत, सोबतीला आठवणीचे चटके आणि इच्छा असूनही पावसात न भिजण्याची स्वतःच स्वतःला घातलेली शपथ.

या वयाला पार करून गेलेला पाऊस मात्र याहून खूप वेगळा ऑफिसला दांडी म्हणून वैताग, घरात छत्र्या रेनकोट ची खरेदी म्हणून वैताग, मुलाचं आजारपण म्हणून वैताग आणि गच्चीवरची ‘’ओन्ली मेन ‘’ पार्टी बंद म्हणून वैताग. या वैतागत मग कधी रोमांटिक गाण्यांना जागा नसते कि कधी बायकोचा चेहरा बघून सुचणाऱ्या शायरीला जागा नसते. कधी विनाकारण पावसात भिजण नसत कि कधी पेटीत बंद असलेल्या कवितांच्या वहीची साधी आठवणही नसते. उतारवयात मात्र पावसाचा अर्थ नातवंडाना ‘’आम्ही तुमच्या पेक्षा चार पावसाळे अधिक पहिले आहेत’’ अस सुनावतानाच होतो.

कुणाला पावसासारख जगावास वाटत, कुणाला पाऊसच व्हावस वाटत.

थेंबा थेंबा तून जगातल्या प्रत्येक माणसाला आसु आणि हसू वाटताना पाऊस कस बर मोजमाप करत असेल? स्वतःकडे कणभरही राखून न ठेवता फक्त देत राहण्यासाठी पावसाला किती मोठ काळीज कराव लागत असेल.. कोणाच प्रेम, कोणाचा रोष पदरात घेत बरसत राहाणं त्याला कसं जमत असेल. पाऊस देण्यातला आनंद उपभोगत असेल की, देवूनही मी रिकामा म्हणून तो अश्रू ढाळत असेल...., ही सर्व अनुत्तरीत प्रश्ने वयात आलेला पाऊसच विचारू शकतो.

 -    चित्रा बोराडे-राजगुरू, नाशिक