Thursday, September 29, 2011

शहरातील विविध विकास कामांचे उदघाटन सम्पन्न

चोपडा - पालिकेने आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध होत असला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदार, नगरसेवक यांनी हा बहिष्कार टाकला असला तरी राष्ट्रवादीचे पालकमंत्री गुलाब देवकर यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. आघाडीतील काही नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारीदेखील जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गैरहजर होते. बहिष्काराच्या ग्रहणात कार्यक्रम मात्र थाटात पार पडला.

या सोहळय़ात पालिकेने उभारलेले प्रशासकीय भवन, घरकुल योजना, शिवाजी चौकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तीन रस्ते, घरकुल योजना टप्पा क्रमांक-२ या विकासकामांचे भूमिपूजन आदी सोहळा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा राज्यमंत्री पद्माकर वळवी, आ. सुरेश जैन, माजी आमदार गुलाबराव पाटील, अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शहर विकास आघाडीचे नेते माजी आमदार कैलास पाटील, अ‍ॅड. संदीप पाटील, अनिल वानखेडे, काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजप आदी पक्षांचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पद्माकर वळवी यांनी चोपडा पालिकेच्या क्रीडा संकुलासाठी एक कोटींचा निधी १५ दिवसांत देणार असल्याची आणि पालिका कामगार व त्यांच्या पाल्यांकरिता कामगार भवन उभारणार असल्याची घोषणा केली. महसूलमंत्री थोरात यांनी विविध पक्षांनी उभारलेल्या आघाडीने चोपडय़ात विकास साधल्याचे सांगितले. पाचही वर्षे महिला नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली. या बाबी कौतुकास्पद आहेत. तथापि विरोधक म्हणून आ. अरुणभाई गुजराती यांनी पालिकेच्या विकासकामांना कधीही विरोध केला नाही. आ. गुजराती यांच्या सहकार्याचा उल्लेख शिवसेनेचे माजी आ. गुलाबराव पाटील यांनीदेखील केला. धरणगाव तालुक्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करण्याची मागणी पाटील यांनी महसूलमंत्र्यांकडे केली. आ. जैन यांनी आपण भ्रष्टाचारमुक्त निवडणूक लढविण्याचे आव्हान स्वीकारल्याचा पुनरुच्चार केला.

चोपडय़ाच्या विकासासाठी शहर विकास आघाडीने चांगले प्रयत्न केल्याने पुन्हा आघाडीला सत्ता मिळावी, झोपडीमुक्त चोपडा शहर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात आ. शिरीष चौधरी, माजी आ. अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांचीही भाषणे झाली.

No comments:

Post a Comment