'टेक सॅटर्डे'
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११
संगणकाच्या पडद्यावर आपले 'अवतार' निर्माण करून त्याच्या माध्यमातून आपण ॲडव्हेंचर गेम खेळायचा..., वर्ड अथवा एक्सेल फॉर्मेटमध्ये वेगवेगळ्या करामती कशा करायच्या..., कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपल्या सहकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करायचंय.. गोष्टीरुपी मनोरंजनाच्या मार्गाने संगणक शिकण्याची माहिती घ्यायचीयं... चला तर मग 'टेक सॅटर्डे'ला... होय माहिती तंत्रज्ञानातील नवनवीन माहिती घेऊन आलाय 'टेक सॅटर्डे'...
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन कामात प्रभावीपणे करण्याची आवड निर्माण व्हावी, या क्षेत्रातील नवनवीन उपकरणांची, तंत्रज्ञानाची माहिती त्यांना व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग व सचिवालय जिमखाना यांनी हा 'टेक सॅटर्डे' आयोजित केला होता. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा First saturday tech saturday campaign अंतर्गत हा 'टेक सॅटर्डे' साजरा करण्यात येणार आहे. खरे तर मंत्रालयाच्या गेटवर गेल्या दोन दिवसांपासून या 'टेक सॅटर्डे' चा बोर्ड लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे माझी उत्सुकता वाढली होती की, काय आहे हा 'टेक सॅटर्डे'. नेहमीप्रमाणे कुठल्या तरी दिवसा सारखा तर हा 'टेक सॅटर्डे' तर नसेल, असे अनेक प्रश्न मनात होते. त्यामुळे मी कामावर आल्यावर लगेच सचिवालय जिमखान्याच्या दिशेने गेलो. जिमखान्याच्या सभागृहात प्रवेश केला अन् एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखे झाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल लागले होते.
प्रवेश केल्यावर समोरच 'कंम्प्युटर मस्ती' चा स्टॉल होता. तिकडे गेलो. सहज सोप्या व गोष्टी रुपात लहान मुलांनाही समजेल अशा रितीने संगणक कसा शिकायचा, याची माहिती या ठिकाणी देण्यात येत होती. इनओपन टेक्नॉलॉजीज व 'आयआयटी' मुंबई यांचा हा उपक्रम आहे. शाळांमधून संगणकाचे शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये झालेल्या संशोधनावर आधारित हा 'कंम्प्युटर मस्ती' उपक्रम आहे. पाठ्यपुस्तकांबरोबरच ॲनिमेशन, गेम्स आणि इंटरॲटिव्ह मिडीयामधून संगणक शिक्षण दिले जाते. ही सर्व माहिती मला नवीनच होती. त्यामुळे माझ्या ज्ञानात भरच पडली.
नॅसकॉमतर्फेही वर्ड, एक्सेल यामध्ये कसे काम करायचे. वर्ड २००७ची वैशिष्ट्ये आदी विषयीही माहिती दिली. त्यांचा एक मदतनीस शेजारच्या लॅपटॉपवर नेहमी काम करणाऱ्या वर्ड, एक्सेल मधील नवनवीन माहितीचा वापर कसा करायचा हे सांगत होता. नेहमी वर्ड, एक्सेलमध्ये काम करत असूनही अनेक गोष्टी नवीन होत्या. त्यामुळे येथे आल्याचा मला फायदाच झाला.
त्याच्या शेजारीच संगणकावर एक भन्नाट खेळ सुरू होता. आतापर्यंत आपण फक्त संगणकावरच्या व्हिडीओ गेमवर बटणाच्या सहाय्याने खेळ खेळत होतो. पण येथे आपण स्वतःचा एक 'अवतार' या संगणकावर निर्माण करून त्याला आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे खेळायला लावू शकत होतो. एका मोठ्या एलसीडी स्क्रिनच्या समोर आपण स्वत: उभारून हा ॲडव्हेंचर गेम खेळायचा. यात आपण जागेवर उभारून जशी हालचाल करू तशीच हालचाल संगणकावरील आपला हा 'अवतार' करायचा. अतिशय मजेशीर असा हा गेम होता. संगणकाने किती क्रांती केली आहे, याचे हे एक छोटेसे उदाहरण होते.
शासकीय कार्यालयामध्ये अनेक बैठका होतात. मंत्रालयात होणाऱ्या बैठकांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक अधिकारी/कर्मचारी येत असतात. त्यांना त्यासाठी प्रवासाची दगदग करावी लागते. ही दगदग होऊ नये, सामान्य जनतेची कामे खोळंबू नयेत, यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय समोर आला आहे. हे व्हिडिओ कॉन्फरसिंग कसे चालते. त्यामागची टेक्नॉलॉजी काय आहे, याचाही माहिती येथील एका स्टॉलवर मिळत होती. ग्रुप इ-मेल, ग्रुप कॉन्फरन्सिंग, तसेच इतर तंत्रज्ञानाविषयीही माहिती यावेळी मिळाली. मनात आले की, जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली तर कितीतरी कामे कमी खर्चात व जनतेची कोणतीही गैरसोय न होता होईल. या तंत्रज्ञानामुळे पैसा व वेळ दोन्हीही वाचेल, यात शंका नाही. महाराष्ट्र शासनाने यासाठीही पाऊल उचलल्याचीही माहिती यावेळी मिळाली.
या अनमोल माहितीबरोबरच कार्यालयात नेहमी वापरणाऱ्या प्रिंटर, फॅक्स, स्कॅनर या साहित्याच्या उत्पादनात किती बदल झाले आहेत, याची माहितीही मिळत होती. 'एचपी' या कंपनीने ई प्रिंटर, कॉम्पॅक्ट स्कॅनर, कुठेही नेता येणारे व बॅटरीवर चालणारे फॅक्स व झेरॉक्स मशीन याची माहिती डेमोसह येथे दिली होती. ई प्रिंटरवर तर तुम्ही मोबाईलवर आपला फोटो काढून अथवा मोबाईवरील एखादे डॉक्युमेंट थेट ई मेल केल्यावर तुमचा फोटो किंवा डॉक्युमेंट प्रिंट होतो. मीही मोबाईल वर माझा एक फोटो काढून प्रिंटरकडे पाठविला तर लगेच त्याची प्रिंट आली. तंत्रज्ञान किती वेगाने पुढे गेले आहे, याचा हा साक्षात नमुनाच होता. अनेक शासकीय कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांना हे पाहून आश्चर्य वाटले असल्यास नवल नाही.
संगणक पर्यायाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या काय लेटेस्ट आहे... कोणती नवनवीन तंत्रे आली आहेत.., नवनवीन सॉफ्टवेअर काय आहेत... याची संपूर्ण माहितीच या 'टेक सॅटर्डे' मधून मला समजली. महाराष्ट्र शासन ई-गर्व्हनन्सच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मंत्रालयात अथवा शासकीय कार्यालयात आता सगळी कामे संगणकावर होत आहेत. तरीही अनेकजण संगणकावर काम करायला बिचकतात. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्याच पुढाकाराने महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरूवात आजपासून झाली. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंत्रालयाबरोबरच जिल्हास्तरावरही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मला मिळाली. खरंच अशा उपक्रमाची गरज होती, असं मला मनातून वाटतं होत. संगणकावर काम न करणाऱ्यांसाठी तर हे 'टेक सॅटर्डे' उपयुक्त आहेच.. त्याशिवाय जिज्ञासूंनी देखील 'टेक सॅटर्डे'ला हजेरी लावायला हरकत नाही. नवनवीन ज्ञानाबरोबरच आपल्याला असलेल्या ज्ञानातून बक्षिसही या उपक्रमात मिळवता येणार आहे. चला तर मग 'टेक सॅटर्डे'मध्ये सहभागी व्हायला.. अं हं.. आता वेळ संपली... आता प्रतिक्षा करा पुढच्या महिन्याच्या पहिल्या शनिवारची... तर मग भेट देणार ना 'टेक सॅटर्डे'ला....
No comments:
Post a Comment