Tuesday, December 4, 2012

'' कण्हेरीची फुले '' : विश्वविक्रमी '' मराठी ब्रेथलेस '' अल्बमचे पुण्यात शानदार सोहळ्यात प्रकाशन

 '' कण्हेरीची फुले ''या विश्वविक्रमी '' मराठी ब्रेथलेस '' अल्बमचे
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या  एका शानदार
सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.  सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी एका
श्वासात म्हटलेले गाणे तसेच प्रसिद्ध अभिनेता
 अमोल कोल्हे याने एका श्वासात केलेले अभिवाचन पडद्यावर
ध्वनीचित्रफितीद्वारे ऐकल्यानंतर सभागृहातील रसिक श्रोत्यांनी प्रचंड
टाळ्यांच्या गजरात  'युनिव्हर्सल  मूझ्यिक ग्रुप' च्या या अभिनव उपक्रमाचे
कौतुक केले.


 प्रारंभी अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील यांच्या हस्ते या ''
मराठी ब्रेथलेस '' गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी
व्यासपीठावर गायिका बेला शेंडे, गायक प्रसेनजीत कोसंबी, निर्माते आणि
गीतकार शंकर जांभळकर , संगीतकार तेजस चव्हाण, कवयित्री आणि
दिग्दर्शिका प्राजक्ता गव्हाणे, 'युनिव्हर्सल  मूझ्यिक ग्रुप' चे राजन
प्रभू आणि इतर तंत्रद्य व कलाकार उपस्थित होते.  गायक
प्रसेनजीत कोसंबी यांच्या या अल्बममधील गीतानेच या कार्यक्रमाला सुरुवात
झाली. निवेदिका तेजश्री धारणे हिने यावेळी खास शैलीत घेतलेल्या मुलाखतीत
गायिका बेला शेंडे, प्रसेनजीत कोसंबी,  गीतकार शंकर
जांभळकर , संगीतकार तेजस चव्हाण, आणि दिग्दर्शिका प्राजक्ता
गव्हाणे यांनी '' कण्हेरीची फुले '' या अल्बमचा प्रवास कथन केला.
       बेला शेंडे यांनी यावेळी सांगितले की, कवयित्री प्राजक्ता गव्हाणे आणि
संगीतकार तेजस चव्हाण यांनी जेंव्हा अडीच पानाचा मजकूर असलेले गाणे वाचून
दाखविले आणि ते  एका श्वासात म्हणायचे आहे असे सांगितले तेंव्हा मला
स्वत:ला ते खूप आव्हानात्मक वाटले. एक वेगळा प्रयोग म्हणून त्यापाठीमागील
त्यांच्या प्रामाणिक भावना मी ओळखल्या आणि सतत दोन महिने सराव करून ते '
ब्रेथलेस गाणे' अखेर गायले. गाव आणि शहर यांना जोडणाऱ्या त्या गाण्याचे
शब्द इतके सुंदर होते के, गाताना अनेक जुन्या गोष्टी आठवत गेल्या असेही
तिने आवर्जून सांगितले. गायक प्रसेनजीत कोसंबी यानेही या गाण्यातुंन
गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यामुळे गाणे गाताना एक वेगळ्या
प्रकारचा आनंद मिळाला अशी भावना व्यक्त केली.




निर्माते आणि गीतकार शंकर जांभळकर यांनी, अंतर्मनाच्या उर्मीतून निर्माण झालेल्या
भावना गीतांच्या रूपातून या अल्बममधील गाण्यात व्यक्त झाल्याचे सांगितले. तर संगीतकार तेजस
चव्हाण आणि दिग्दर्शिका प्राजक्ता गव्हाणे या दोघांनीही  '' मराठी ब्रेथलेस '' बाबत खूपच उत्सुकता होती
व त्यासाठी खूप मेहनत घेवून सर्वांच्या सहकार्याने मराठीतील हा वेगळा प्रयोग
यशस्वी करून दाखविल्याचे सांगितले. तेजस चव्हाण याने यावेळी या अल्बममधील
गाणेही म्हणून दाखविले त्यालाही रसिक श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली.

    यावेळी या अल्बममध्ये गाणे गाणारे जेष्ठ गायक सुरेश वाडकर तसेच
ब्रेथलेस अभिवाचन करणारे डॉ. अमोल कोल्हे आणि ज्यांच्या हिंदी ब्रेथलेस
गाण्यावरून प्रेरणा घेवून हा  अल्बम तयार करण्यात आला ते प्रसिद्ध गायक
शंकर महादेवन यांनीही पडद्यावर ध्वनीचित्रफितीद्वारे या प्रकाशन सोहळ्याला
खास शुभेच्छा दिल्या. मराठी साहित्य विश्वात प्रथमच ''  ब्रेथलेस '' सादर
 करणाऱ्या '' कण्हेरीची फुले '' या अल्बमची ' लिम्का वर्ल्ड बुक ऑफ रेकौर्ड ' नेही दखल घेतली
 आहे. शहरात कष्ट करून दमलेल्या तरीही गावकुसाच्या आठवणींनी व्याकूळ
होणाऱ्या रुखरूखणाऱ्या मनाची होरपळ या अल्बममधील
गीतांमधून तरलतेने मांडण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment