Saturday, January 7, 2012

कुटुंबवत्सल - जमुनाबेन गुजराथी

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या मातोश्री जमुनाबेन गुजराथी यांचे काल (ता. 6) निधन झाले. त्यानिमित्त...

जमुनाबेन गुजराथी यांचा जन्म एक नोव्हेंबर 1910 ला झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह चोपडे येथील स्वातंत्र्य सैनिक गोवर्धनदास भिकारीदास शहा ऊर्फ मगनभाई (बाबाजी) यांच्याशी झाला. त्यांचे शिक्षण अल्प असले, तरी स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे पती बाबाजी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या कार्यात त्यांचेही पूर्ण सहकार्य होते. या काळात त्यांच्या निवासस्थानी महात्मा गांधींनी भेट दिली होती. स्वातंत्र्य चळवळीविषयी मार्गदर्शन केले होते. पूज्य साने गुरुजी भूमिगत असताना त्यांचाही सहवास त्यांना लाभला होता. त्यांच्या विचाराही प्रभाव त्यांच्यावर होता.

जुन्या जमान्याच्या जमुनाबेन धार्मिक व सनातनी कुटुंबात जन्माला आल्या असल्या, तरी आधुनिक विचारसरणी स्वीकारण्याची त्यांची वृत्ती होती. कुटुंबात मुलांवर संस्कार त्यांनी घडवले. बाबाजींच्या मार्गदर्शनामुळे स्वातंत्र्य आंदोलनात कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे त्यांच्या निवासस्थानी येणे जाणे होते. याच्यातून या नेत्यांच्या विचारांचा प्रभाव व परिचय त्यांना झाला. त्यांचा स्वभाव कोणाशी वैर करण्याचा नव्हता. कोणाची निंदा करणे त्यांना आवडत नसे. कुटुंबात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रसन्न मुद्रेने त्या स्वागत करीत.

जमुनाबेन यांचे व माझे आजोबा (कै.) स्वातंत्र्य सैनिक मगनलाल नगीनदास यांचे भावा-बहिणींचे नाते होते. त्या माझ्या मावशी कमलबेन यांच्या सासू होत्या. सुनांना मुलीसारखे वागवण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी 1947 मध्ये महाराष्ट्र महिला परिषदेचे आयोजन करून त्याचे स्वागताध्यक्षपद भूषविले होते. महिलांच्या अनेक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. महिला परिषदांच्या निमित्ताने जळगाव, नाशिक, पुणे या ठिकाणी त्यांची उपस्थिती होती. महिलांनी शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटत होते. भगिनी मंडळ या संस्थेची त्यांनी यासाठी स्थापना केली. 1962 च्या दुष्काळात एक आण्यात भाजी-भाकरीचे आयोजन बाबाजींनी केले. त्यात त्यांचा मोठा वाटा होता. पूज्य विनोबा भावे यांच्या सर्वोदय चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या अनेक राष्ट्रीय अधिवेशनाला त्यांनी बाबाजींसोबत उपस्थिती दिली. जमुनाबेन कुटुंबवत्सल होत्या. गेल्या दोन वर्षापूर्वी शंभरी पार केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी आवाहन करताना व सदिच्छा देताना आपणही चांगले काम करा व यातून मोठे व्हा अशा सदिच्छा व्यक्त केल्या. त्या गांधीवादी विचारांच्या होत्या.

जीवनाच्या अखेरपर्यंत खादीची साडी परिधान केली. "खादी वस्त्र नव्हे तर विचार' ही भावना त्यामागे होती. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या हीरक महोत्सवी अधिवेशनात उत्तम काम केल्याबद्दल त्यांना चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर जळगाव जिल्हा सोशल वेल्फेअर बोर्डावर सदस्या म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अशा प्रेमळ व कुटुंबवत्सल जमुनाबेन यांच्या कुटुंबात विठ्ठलदास, वसंतलाल, डॉ. वल्लभदास, अरुणभाई असे चार भावंडे डॉ. सुशिलाबेन शहा, कमलबेन अशा तीन बहिणी एकत्र कुटुंबाचा एक आदर्श गावालाच नव्हे तर तालुक्‍याला होता. त्यांचे घर म्हणजे तालुक्‍याच्या गोरगरीब लोकांचे एक आपुलकीचे नाते जोडणारे होते.

जमुनाबेन यानी बाबाजींबरोबर गोरगरिबांची सेवा करताना कुटुंबातील सभासदांवर संस्कार टाकताना त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत सेवाभाव करुणा, प्रेम या तत्त्वांचा समन्वय सोडला नाही. अशा प्रकारच्या जमुनाबेन ऊर्फ मोठ्या आई यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- माधुरी मयूर, सचिव, चोपडे शिक्षण मंडळ, चोपडा.

No comments:

Post a Comment